नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने(एफडीए) लॅब कॉर्पला आपात्कालीन वापर परवाना(ईयुए) दिला आहे. लॅब कॉर्पने रुग्णांनी स्वत:च्या नाकातून कोरोना चाचणीसाठी घेतलेले नमुने तपासता येतील अशी 'कोविड-१९ आरटी-पीसीआर' चाचणी पद्धत विकसीत केली आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली.
कोरोनामुळे नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. प्रत्येकाला स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेण्याची इच्छा आहे मात्र, आरोग्य व्यवस्थेवर सध्याचा ताण बघता ते शक्य नाही. तरीही नागरिकांना योग्य सुविधा पुरवण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. लॅब कॉर्पने तयार केलेल्या चाचणी पद्धतीमुळे नागरिकांना स्वत:चे नमुने घेता येणार आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती अमेरिकन एफडीएचे आयुक्त स्टीफन हान यांनी दिली.
लॅब कॉर्पच्या सांगण्यानुसार, त्यांनी तयार केलेली कीट नागरिकांचे वैद्यकीय नमुने गोळा करणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी खुपच फायद्याची ठरणार आहे. ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत ते नागरिक स्वत: नमुने घेऊन आरोग्य सेवकांकडे देतील त्यामुळे वेळ वाचण्यास मदत होईल.
लॅब कॉर्प कंपनीला अमेरिकन एफडीएने परवानगी दिल्याने त्यांनी या कीटची मोठ्या प्रमाणात निर्मिती हाती घेतली आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये देशातील सर्व आरोग्य कर्मचाऱयांना या कीट दिल्या जातील.
कोरोनामुळे अमेरिका मोठ्या संकटात सापडली आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत १० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे.