नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) मुलाखतीकरता दिल्लीत येणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना विमानाने जाण्याचा-येण्याचा खर्च युपीएससी देणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे देशात पूर्णत: रेल्वे सेवा सुरू झाली नाही. त्यामुळे युपीएससीने विमान तिकिटांचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांची दिल्लीत राहण्याची सोय आणि वाहतुकीची सुविधाही युपीएससीही करणार आहे. रेल्वे सेवा अजून पूर्णपणे सुरू झाली नाही. त्यामुळे एकवेळ उपाययोजना म्हणून मुलाखतीला येणाऱ्या उमेदवाराचा कमीत कमी दरातील विमान तिकिटांचा खर्च करण्यात येणार असल्याचे युपीएससीने म्हटले आहे. मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना प्रतिबंधित क्षेत्रातून जाण्यासाठी व येण्यासाठी ई-पास द्यावेत, अशी युपीएससीने राज्यांना विनंती केली आहे.
युपीएससी 623 उमेदवारांच्या मुलाखती नागरी सेवेकरता घेणार आहे. कोरोना महामारीतील टाळेबंदीमुळे मुलाखती रखडल्या आहेत. या मुलाखती 20 जुलै ते 30 जुलै 2020 दरम्यान घेण्यात येणार आहेत. मुलाखतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराला एक सीलबंद कीट देण्यात येणार आहे. त्यामध्ये हातमोजे, मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायझर असणार आहे. दरम्यान, युपीएससीमध्ये मुलाखत हा निवड प्रक्रियेमधील अंतिम टप्पा आहे. यामधून आयएएस, आयएफएस आणि आयपीएससह इतर सनदी अधिकाऱ्यांची निवड करण्यात येते.