लखनऊ : वादात अडकलेल्या तांडव या वेबसीरिजविरोधात उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू देवतांना आक्षेपार्ह्यरित्या दाखवण्यात आल्याचा आरोप ठेवत, दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले आहे.
हझरातगंज पोलीस ठाण्यामध्ये रविवारी रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये अॅमेझॉन प्राईमच्या ओरिजिनल कंटेंट विभागाच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माते हिमांशू कृष्णा आणि आणखी एका अज्ञाताच्या नावांचाही यात उल्लेख करण्यता आला आहे. यापूर्वी रविवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाने याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते.
ओटीटीलाही असावी सेन्सॉरशिप..
दरम्यान, तांडव या वेबसिरिजला राज्यासह देशभरातून विरोध केला जात आहे. ओटीटीवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांमध्ये मोठ्याप्रमाणात अश्लीलपणा दाखवला जात आहे. इतकेच नाही तर देवी-देवतांबाबतही अक्षेपार्ह विधान केले जात आहे. यामुळे ओटीटीसाठीही सेन्सॉरशीप असावी, अशी मागणी मुंबई भाजपाचे सचिव अॅड. ज्ञानमूर्ती शर्मा यांनी केली आहे. जर भविष्यात हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या वेबसीरीज झाल्या तर आम्ही निषेध करू तसेच निर्माते व कलाकारांवर बहिष्कार घालू, असेही ज्ञानेश्वर शर्मा म्हणाले.
राज्यातही तक्रार दाखल..
या मालिकेविरोधात भाजपचे आमदार राम कदम यांनी बीकेसी येथे तर मुंबई भाजपचे सचिव शर्मा यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. यावेळी तांडव वेब मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे राम कदम यांनी सांगितले. तांडव या प्रदर्शित झालेल्या वेब मालिकेविरोधात भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले असून खासदार मनोज कोटक यांनीही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून वेब मालिकेच्या निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा : 'पतौडी पॅलेस'मध्ये झालंय 'तांडव'चे शुटिंग!! सैफ अलीने केला खुलासा