नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर सोमवारी रात्री काही हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये विक्रम जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांना न्याय मिळावा यासाठी गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयाबाहेर पत्रकारांकडून धरणे आंदोलन करण्यात आले.
जोशी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे. या घटनेनंतर त्यांना आता कामावर जाण्याची भीती वाटत असून जोशी यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करू, असे पत्रकार म्हणाले.
पोलिसांनी या प्रकरणी नऊ आरोपींना पकडले असून मुख्य आरोपीचे नाव रवी आहे. छोटू, मोहित, दलवीर, आकाश उर्फ लुल्ली, योगेंद्र, अभिषेक हकला, अभिषेक मोटा आणि शकीर अशी इतर आरोपींची नावे आहेत. अशोक नावाच्या आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
20 जुलैला हल्लेखोरांनी जोशीवर गोळी झाडली होती. जोशी यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यावेळी जोशी यांची मुलगी त्यांच्यासोबत होती. गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोशी यांच्या पत्नीला दहा लाख रुपयांची भरपाई आणि नोकरी जाहीर केली आहे.