कोटा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेकजण दुसऱ्या राज्यात अडकून पडले आहेत. कोचिंग क्लास करण्यासाठी राजस्थानमधील कोटा शहरात गेलेले अनेक विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत. त्या विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात आणण्यासाठी ज्या त्या राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राजस्थानमध्ये बस पाठवल्या आहेत.
आत्तापर्यंत कोटामधून मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, हरियाणा, आसाम आणि पंजाब राज्यातील विद्यार्थी कोटामधून आपापल्या घरी पोहोचले आहेत. बिहार, महाराष्ट्र आणि झारखंडमधील अनेक विद्यार्थी कोटोमध्ये आहेत. येथील सरकारनेही विद्यार्थी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जाण्याची परवानगी मिळाली आहे, अशांना येण्यासाठी वाहने मिळत नाहीत. तर काहींना मोठा खर्च सांगितला जात आहे.
ईटीव्ही भारतने बिहार आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता विद्यार्थी म्हणाले की, आमच्या सरकारने आमच्यासाठी बस पाठवणे गरजेचे आहे. कारण, येथून आमच्या राज्यात जाण्यासाठी लागणारा खर्च मोठा आहे. सध्या जाण्यासाठी वाहनेही उपलब्ध होत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोटामध्ये राहणाऱ्या किर्ती व्यास यांनी सांगितले की, प्रती किमी 18 रुपयाने टॅक्सी आम्ही बुक केली आहे. आम्हाला कोटावरुन मुंबईमध्ये जायचे आहे. मात्र, तो खर्च 40 हजार रुपये येत असल्याचे त्यांनी सांगितले.