लखनऊ (उ.प्र) - मजलीस-ए-उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना कलबे जव्वाद यांनी मोहरमच्या विधीसंबंधी काही मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने शिया समुदायातील नागरिकांना काही अटींसह घरात ताझिया ठेवणे तसेच अझादारी पाळण्याची परवानगी दिली आहे.
कोरोना काळात खबरदारी म्हणून राज्य सरकारने मोहरमच्या विधींवर निर्बंध घातले होते. या विरोधात जव्वाद यांनी शनिवारी आंदोलन केले होते. त्यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास सरकारने काही अटींसह मोहरम साजरा करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, असे करताना सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिया मौलवींचा संपर्क क्रमांक मागितला आहे. हे मौलवी जिल्ह्यातील नागरी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणार व मोहरम दरम्यान जिल्ह्यात होणाऱ्या उपक्रमांसंदर्भात अधिकाऱ्यांशी समन्वय साधणार.
तसेच, मोहरमसाठी एका सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. हा अधिकारी मोहरम दरम्यान येणाऱ्या तक्रारींचे निवारण करेल.
मोहरम मजलीस दरम्यान कोविड-१९ चे सर्व नियम पाळल्या जातील, असे एका बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, यासंबंधी भाजप सरकार ही दिलेल्या आश्वासनातून पलटली असल्याचा आरोप जव्वाद यांनी केला होता. त्यानंतर काल मध्यरात्री राज्य सरकारने मोहरम संदर्भी निर्बंध शिथिल करून शिया समुदायाला दिलासा दिला आहे.
हेही वाचा- मालिका अन् चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी; 'या' नियमांचे करावे पालन