लखनऊ - उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात, आई आणि दोन मुलींवर त्यांच्याच नातेवाईकांनी अॅसिड फेकल्याची घटना घडली. यामध्ये या तिघीही गंभीररीत्या भाजल्या गेल्या आहेत. रविवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला देवी (४५), ज्योती (२०) आणि आरती (१८) अशी जखमींची नावे आहेत. वाराणसीच्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शीला देवी यांचे पती राजेंद्र प्रसाद यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे नातेवाईक विमलेश आणि संदीप हे रविवारी रात्री राजेंद्र यांच्या घरात शिरले होते. त्यावेळी झोपलेल्या शीला देवी आणि त्यांच्या दोन मुलींवर या दोघांनी अॅसिड फेकले. घराजवळच्या नळावर भांडी धुण्यावरून शीला देवी आणि विमलेश यांच्यामध्ये वाद झाला होता. त्याच्या काही तासांनंतर ही घटना घडल्यामुळे, भांडणाचा राग मनात धरून विमलेश आणि संदीपने हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
विमलेश हा ग्यानपूर कोतवालीमध्ये लेखपाल म्हणून काम करतो. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, त्याचा भाऊ संदीपचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : १०० गुन्हे दाखल असलेला माजी नक्षलवादी लढवणार झारखंड विधानसभा निवडणूक...