अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमधील विद्यापीठांनी याबाबत तयारी सुरू केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याच असा यूजीसीचा आग्रह आहे. महामारीचा सध्याचा धोका लक्षात घेता, सप्टेंबर २०२०मध्ये या परीक्षा घ्या असे आदेश यूजीसीने दिले आहेत. तसेच, या आदेशांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटले आहे.
आंध्र प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता बाळगत परीक्षांचे आयोजन कसे करण्यात येईल याबाबत सध्या योजना आखल्या जात आहेत. आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. के. वेंकट राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी आणि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ७५५ विद्यापीठांपैकी १९४ विद्यापीठांच्या परीक्षा यापूर्वीच पार पडल्या आहेत. तसेच, ३६६ विद्यापीठांनी परीक्षांचे आयोजन करण्यास तयारी सुरू केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्लीसारख्या राज्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत परीक्षा न घेण्याची भूमीका घेतली आहे.
हेही वाचा : गाजियाबादमध्ये पत्रकारावर जीवघेणा हल्ला; नऊ आरोपींना अटक