वाराणसी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे. वाराणसीत माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधींवर भाष्य केले. ते म्हणाले की, "राहुल गांधींनी आधी काँग्रेस पक्ष चालवावा आणि मग देश चालविण्याविषयी विचार करावा" उत्तरप्रदेशमध्ये रिपब्लिकन पक्षाला बळकटी देण्यासाठी नव्याने प्रयत्न करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
हेही वाचा - भाजपला शिवसेना 'नकोशी' झालीये का?
राहुल गांधींच्या बोलण्यामुळे काँग्रेसची गैरसोय होते, असा टोला आठवले यांनी लगावला आहे. आठवले म्हणाले "मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यावर लोकांनी त्यांच्यावर बरेच आरोप केले होते. निवडणुकीच्या अगोदर कुणी त्यांना थाप मारणारे ठरवले तर कुणी त्यांना तुरूंगात पाठवण्याची भाषा केली. पण, तसे काहीही झाले नाही कारण जनतेपुढे पर्याय नव्हता. राहुल गांधी निरर्थकपणे कुठल्याही गोष्टीत उडी घेऊन नको ते बोलतात. सत्य हे आहे की, राहुल गांधी आपला पक्ष चालवण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या बोलण्यामुळेच काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - पुण्यात आघाडीचं ठरलं! अशी आहे जागांची वाटप
रामदास आठवले यावेळी आपला पक्ष उत्तरप्रदेशमध्ये मजबूत करण्यासाठी पक्षाचे सदस्यत्व देण्याच्या मोहिमेविषयी बोलले. ते म्हणाले, बसपाचे बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत. लोक मायावतींवर नाराज आहेत कारण, मायावती दलित अनुकूल असण्याचे नाटक करतात. आता लोक त्यांच्यापासून दूर जात आहेत. आज अमेरिकेत मोदींनी आयोजित केलेल्या मोठ्या कार्यक्रमाचा ट्रम्प यांना फायदा होईल का, या प्रश्नावर आठवले म्हणाले "या कार्यक्रमांचा पंतप्रधान मोदींना 80% फायदा होईल आणि ट्रम्प यांना 20% फायदा होईल. अमेरिकेचे भारताशी संबंध चांगले आहेत. ट्रम्प या कार्यक्रमात मोदींसोबत उपस्थित राहून अमेरिकेत स्थित भारतीय लाकांची मते मिळवून स्वत: ला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत.