श्रीनगर (जम्मू-काश्मीर) - मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील नौगम बायपासजवळ आज अज्ञात अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन पोलिसांना वीरमरण आले आहे, तर एका जखमी पोलिसावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात दहशतवाद्यांनी नौगाम बायपासजवळ पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना वीरमरण आले असून एका पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली गेली आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवसाआधी हा हल्ला झाल्याने पोलीस सतर्क झाले आहे.