नवी दिल्ली/अदीस अबाबा - इथोपियन एअरलाइन्सच्या विमान अपघातात प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह १५७ जण ठार झाले. यात ४ भारतीयांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. यात पर्यावरण मंत्रालयाशी संबंधित यूएनडीपीच्या सल्लागारासह ४ भारतीय ठार झाले आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली.
बोईंग ७३७ या प्रवाशी विमानाने रविवारी सकाळी नैरोबीला जाण्यासाठी अदीस अबाबा येथून उड्डाण केले. मात्र, यानंतर काही मिनिटांनी विमानाला अपघात झाला. यात विमानातील १४९ प्रवाशांसह ८ विमान कर्मचारी ठार झाले.
भारताचे ४ नागरिक
या अपघातातील मृतांमध्येसंयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी)च्या सल्लागार शिखा गर्ग यांचा समावेश आहे. त्या पर्यावरण आणि वन विभागाशी संबंधित होत्या. नैरोबी येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात (यूएनईपी) भाग घेण्यासाठी त्या निघाल्या होत्या. याशिवाय, पन्नागेश भास्कर वैद्य, हंसिनी पन्नागेश वैद्य, मनीषा नुकावरापू अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच, या सर्वांच्या कुटुंबीयांपर्यत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. ‘इथियोपियन एयरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला. यात मृत्यू आलेल्यांविषयी मला दुःख झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या शोकात सहभागी आहे,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पर्यावरण मंत्र्यांनी दुःख व्यक्त केले
पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी ट्विट करून या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. ‘इथियोपियन एयरलाइन्स विमान अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसेच, माझ्या मंत्रालयाशी संबंधित यूएनडीपीच्या सल्लागार शिखा गर्ग यांचाही या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्याला शांति मिळण्यासाठी मी प्रार्थना करतो.’