जयपूर - राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात रविवारी एका भरधाव ट्रकने दोन यात्रेकरूंना चिरडल्याची घटना समोर आली आहे. सूरतगड-बिकानेर महामार्गावरील हरिसार गावाजवळ हा अपघात झाला. नेतराम मोची (वय, 40) आणि सुभाष कुंभार (वय, 20) अशी मृतांची नावे आहेत.
पंजाबच्या अबोहर येथील रहिवासी असलेले दोन यात्रेकरु जैसलमेरच्या रामदेवराच्या दिशेने जात होते. दरम्यान, एका भरधाव ट्रकने या दोघांना चिरडले. यानंतर चालक घटनास्थळावर ट्रक सोडून फरार झाला आहे. लुंकरसर पोलीस ठाण्याचे प्रभारी ईश्वरानंद यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
दरम्यान, शवविच्छेदनानंतर यात्रेकरुंचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर फरार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.