आग्रा - देशभरात कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस अधिकची भर पडत आहे. त्याच प्रमाणे आग्रा शहरातही कोरोनाने चांगलेच पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यामध्ये उपचारासाठी दाखल होताच ४८ तासात मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. आता पर्यंत २८ जणांचा अशा प्रकारे तत्काळ मृत्यू झाला आहे.
आज (शुक्रवारी) सकाळी आग्र्यात २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ११ नवे रुग्ण आढळून आले असल्यचाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आजच्या आकडेवारीनुसार आग्र्यात आजपर्यंत एकूण १ हजार १७७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ९८४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत आग्र्यात एकूण ८४ जणांचा या महामारीमुळे बळी गेला आहे.
आग्रा शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूदर रोखण्यासाठी एस.एन. मेडिकल महाविद्यालयाच्या प्रशानाने आता ५ वरिष्ठ डॉक्टरांचे समिती गठीत केली आहे. कोरोनामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताच ४८ तासांमध्ये काही रुग्णांचा मृत्यू झाला, त्यापैकी जे वयस्क आहेत, त्यांचा यामध्ये समावेश असल्याचे समितीने म्हटले आहे. या मृत्यूसंदर्भात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर आता जिल्हा प्रशासनाने नियमितपणे कोरोनाबाधिताच्या मृत्यूची कारणमिमांसा करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्ममातून मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत होईल अशा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.