श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अद्याप शोधमोहीम सुरू आहे.
'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, सोपोरच्या हर्दशिवा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. तेव्हा जवानांनी शोधमोहीम सुरू हाती घेत दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला घेराव घातला आणि दहशतवाद्यांना सरेंडर करण्यास सांगितले. तेव्हा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
दरम्यान, सुरक्षा दलाच्या जवानांनी या महिन्यात आतापर्यंत १४ कारवाया केल्या आहेत. यात ४१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले. दोन दिवसांपूर्वीच पुलवामा येथे जवानांनी एन्काउंटरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
मागील रविवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीन आणि इस्लामिक स्टेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईनंतर जम्मू-काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, मागील चार महिन्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि अंसार गजवत-उल हिंद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांवर कारवाई करत त्यांना यमसदनी धाडण्यात येत आहे.
हेही वाचा - कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय....आता खासगी क्षेत्राला अवकाशाची दारं खुली
हेही वाचा - भारताच्या हद्दीत नेपाळच्या लष्कराकडून हेलिकॉप्टर तळाची उभारणी