अनंतनाग (जम्मू-काश्मीर) - जिल्ह्यातील वाघामा परिसरात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. आणखी काही दहशतवादी असल्याचा सुरक्षा दलाला शंका असल्याने आसपासच्या परिसरात शोध मोहिस सुरु करण्यात आली आहे.
याबाबत जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) एक जवान और पाच वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना या चकमकीत ठार केले आहे.
सोमवारीही (दि. 29 जून) अनंतनाग जिल्ह्याच्या के खुलचोहर परिसरात सुरक्षादलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ज्यात अनंतनाग जिल्ह्यातील हिज्बुल कमांडर व एक लष्कर-ए-तैयबाच्या कमांडराचा समावेश होता.
यापूर्वीही 26 जून रोजी पुलवामा जिल्हातील त्रालजवळील चेवा उल्लार परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. यानंतर त्राल क्षेत्रातील हिजबुल मुजाहिद्दीनचा सफाया झाला होता. 1989नंतर पहिल्यांदाच असे झाले आहे. ही जून महिन्यातील दक्षिण काश्मीरमध्ये 12वी चकमक होती. आतापर्यंत झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 33 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे.
हेही वाचा - गिलानी आणि काश्मीरमधले फुटीरतावादी राजकारण..