नवी दिल्ली - पाकिस्तान पोलिसांनी दोन भारतीय नागरिकांना अटक केल्याचा दावा केला आहे. ईटीव्ही भारतला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, हैदराबाद येथील प्रशांत वैंदम बाबूराव आणि मध्य प्रदेश येथील वारीलाल आणि सुबीलाल यांना १४ नोव्हेंबरला पाकिस्तानच्या बहावलपूर येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबध अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असं' पहिल्यांदा घडलं, अन् ते केलं टीम इंडियानं....
स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे भारतीय नागरिक पासपोर्ट आणि व्हिसा शिवाय चोलीस्तानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना मंडी पोलीस ठाण्याजवळ अटक करण्यात आली. चोलिस्तानची सीमा राजस्थानमधील श्री गंगा नगरच्या सीमेवर आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या एफआयआरनुसार १९५२ च्या पाकिस्तान कायद्यानुसार कलम ३३४-४ अन्वये भारतीय नागरिकांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थर वाळवंटात वेगवान वाऱ्यामुळे आणि वाळूच्या ढिगाऱ्यात बदल झाल्याने राजस्थानजवळील भारत-पाकिस्तान सीमेदरम्यानची काटेरी तार कधीकधी अदृश्य होते. यापूर्वी शेजारच्या देशांतील काही नागरिकांनी अशा पद्धतीने सीमा ओलांडली होती, अशी उदाहरणे सूत्रांनी दिली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने मात्र, या घटनेवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.