कोहिमा - नागालँडमधील इंडो-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आसाम रायफल दलाच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. या घटनेत अन्य ४ जवान जखमी झाल्याची माहिती आहे.
आसाम रायफलची एक तुकडी आज (दि. २६) दुपारी गस्त घालत असताना दहशतवाद्यांकडून एक स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवादी व जवानांच्या दरम्यान चकमक झाली. यात २ जवानांना वीरमरण आले आहे. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी या घटनेला जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नसून त्यांना कायद्यानुसार शिक्षा मिळेल असे सांगितले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आसाम रायफलचे ४ जवानही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तत्काळ उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारत म्यानमार सिमेवर १४७ आणि १४८ क्रमांकाच्या सेक्टरमध्ये ही घटना घडली.