नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक देशाच्या विविध भागात अडकले आहेत. हे नागरिक घरी जाण्यासाठी काहीनाकाही पराक्रम करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार गुरुग्रामध्ये उघडकीस आला. दोन रुग्णवाहिकांमधून १६ नागरिकांना बिहारमध्ये नेण्यात येत होते.
संचारबंदीसाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी चौक्या लावल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी वाटीका चौकीजवळ दोन रुग्णवाहिका पोलिसांनी अडवल्या. गाडीमध्ये रुग्ण असून त्यांच्या सोबतचे इतर नातेवाईक असल्याची माहिती चालकांनी दिली. आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी रुग्णालयाचे बनावट पत्रही दाखवले.
मात्र, गुरुग्राम पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. गुरुग्राममधून १६ नागरिकांना बिहारमध्ये पोहचवण्यासाठी प्रत्येकी ७ हजार रुपये या रुग्णवाहिका चालकांनी घेतले होते. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.