हैदराबाद - भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. त्यासंबंधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी देशाला हादरवून सोडणारी घटना घडली. येथील एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करुन तिला मारण्यात आले होते. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. यातील आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्या संदर्भात तृप्ती देसाई हैदराबादमध्ये आंदोलनासाठी गेल्या आहेत.
हेही वाचा - आणखी एक 'निर्भया'.. डोक्यात गोळी मारून तरुणीला जाळले, हत्येपूर्वी सामूहिक बलात्कार !
या प्रकरणातील चारही आरोपींना अटक झाली आहे. पण, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांना पोलीस कोठडीत ठेवावे, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे. तसेच, एवढी मोठी घटना होऊनही मुख्यमंत्री चंद्रशेखर राव पीडितेच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत. त्यांनी तत्काळ त्यांची भेट घ्यावी अशीही मागणी त्यांनी केली.