ओडिशा- कोरापुट जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीवर मुख्याध्यापिकेच्या पतीनेच वारंवार बलात्कार केला. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समजल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेच्या स्टाफ क्वार्टरमध्ये आपल्या मुख्य़ाध्यापक पत्नीसह राहत असणार्या 60 वर्षीय आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली.
जैपोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीओ) वरुण गुंटुपल्ली यांनी सांगितले की, तो त्या मुलीला स्टाफ क्वार्टर्समध्ये बोलावून वारंवार तिचे लैंगिक शोषण करीत असे. आरोपीने तिच्या आई-वडिलांकडून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिला घरी नेण्यासाठी परवानगी देखील मिळवली होती. मात्र, आरोपीच्या पत्नीला या घटनेविषयी माहिती नव्हती. त्यामुळे घटना उघडकीस येण्यास विलंब झाला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.