नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे येत्या दोन दिवसांमध्ये दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. ते पश्चिम बंगालमधील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. आतापर्यंत शेतकऱ्यांशी झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे, आता या चर्चेत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नक्की वेळ माहित नाही..
"मला नक्की तारीख किंवा वेळ माहिती नाही. मात्र, उद्या किंवा परवा तोमर शेतकऱ्यांशी चर्चा करतील" असे शाहांनी रविवारी स्पष्ट केले. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या 25 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत ते बोलत होते.
आतापर्यंत 33 शेतकऱ्यांचा मृत्यू...
शेतकरी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 33 शेतकऱ्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघात, आजार आणि थंडीमुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश असल्याचे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले. 40 मुख्य शेतकरी संघटना आणि सुमारे 500 इतर शेतकरी संघटनांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर गेल्या 25 दिवसांपासून बसून आहेत.
'पंतप्रधानांच्या 'मन की बात' कार्यक्रमावेळी वाजवाव्या थाळ्या'; शेतकऱ्यांचे देशवासियांना आवाहन..
आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यासाठी रविवारी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले होते. श्रद्धांजली सभेनंतर शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमावेळी त्यांचे भाषण संपेपर्यंत सर्वांनी थाळ्या वाजवाव्या, असे आवाहन भारतीय शेतकरी संघटनेचे नेता जगजितसिंग डालेवाला यांनी केले आहे. येत्या 27 सप्टेंबरला पंतप्रधानांचा 'मन की बात' कार्यक्रम प्रसारीत होणार आहे.
हेही वाचा : चीनी नागरिकांची लडाखमध्ये घुसखोरी; स्थानिकांशी घातली हुज्जत..