हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 184 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर तिरुपती बालाजी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती तिरुपती देवस्थान समितीने दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठिकठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र, तेलंगाणा, कर्नाटक, केरळ, चंदीगड आणि छत्तीसगडमध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता श्री माता वैष्णोदेवी यात्रेलाही स्थगिती देण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत सुमारे 184 जणांना याची लागण झाली असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच साधारणपणे १५ जण योग्य उपचारानंतर यातून बरेही झाले आहेत.
दरम्यान सरकारने कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केले आहे. सरकारकडून नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असलेला हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.
संपूर्ण ब्रम्हांड स्वामीचे मंदिर बंद
तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूचा अवतार मानले जातात. भगवान विष्णूंना संपूर्ण ब्रम्हांडाचं स्वामी मानलं जातं. तिरुमाला पर्वतावर असलेलं तिरुपती बालाजीचं मंदिर हे भारतातील मोठ्या तीर्थस्थळांपैकी एक आहे. तिरुपती बालाजी मंदिर वा वेंकटेश्वर मंदिर, तिरुमला पर्वतरांगेत आहे. हे मंदिर असलेल्या डोंगराला तिरुमला (श्री + मलय) म्हणतात. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढवलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. हे देवस्थान तिरुपती बालाजी म्हणून सर्वांनाच परिचित आहे. तिरुपती बालाजी मंदिरात भक्त फक्त पैसे किंवा सोनंच अर्पण करत नाही तर आपले केस अपर्ण करतात.