बुलंदशहर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेल्या शौचालयाच्या आतील बाजूला चक्क महात्मा गांधींची प्रतिमा असलेल्या टाईल्स वापरण्यात आल्या आहेत. उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील इच्छावरी गावात हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाखो शौचालये बनवण्यात आली आहे. मात्र, या जिल्ह्यातील डिबाई तालुक्यातील दानपूर गावातील इच्छावरी परिसरातील काही शौचालयाच्या बांधकामासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमा आणि राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचे चित्र असलेल्या टाईल्स वापरण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. एकूण १३ शौचालयात या टाईल्स वापरण्यात आला होत्या. जिल्हा प्रशासनाने कारवाई करत या टाईल्स काढून टाकल्या आहेत.
या घटनेचा जिल्हा परिषदेला अहवाल पाठवण्यात आल्यानंतर जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामविकास अधिकारी संतोष कुमार यांना तडकाफडकी निलंबीत केले. तसेच गावच्या सरपंच सावित्री देवी यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानाच्या जिल्हा प्रचारकांचीही पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
याप्रकरणी तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी हा प्रकार गंभीर असल्याने यासंबंधी अधिक तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.