रुद्रप्रयाग - केदारनाथ यात्रेला आलेल्या ३ यात्रेकरुंचा वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला. हृदयक्रिया थांबल्याने या सर्वांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. आता केदारनाथ केदारनाथ यात्रेदरम्यान मृत्यू झालेल्या यात्रेकरूंचा एकूण आकडा ६६ वर पोहोचला आहे.
शनिवारी ६४ वर्षीय कोलकाता येथील रहिवासी चारू बनर्जी यांनी अन्य २४ व्यक्तींच्या गटासह या यात्रेवर आले होते. चारू यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
कर्नाटकातील रहिवासी ६९ वर्षीय नेत्रावती त्यांच्या कुटुंबीयांसह केदारनाथ यात्रेसाठी आल्या होत्या. यादरम्यान गुप्तकाशी येथे अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तेथील आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तसेच, महाराष्ट्रातील रहिवासी ६६ वर्षीय राजन पांडी केदारनाथ येथून दर्शन घेऊन परत निघाले होते. गौरीकुण्ड येथे त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यांना १०८ रुग्णावाहिकेने सोनप्रयाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथए त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी तीनही मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.