चंदीगड - लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी पाठविण्यासाठी गुरुग्राम येथील खोह गावात नोंदणी सुरु असल्याची अफवा स्थलांतरीत मजूरांमध्ये पसरली. त्यानंतर हजारो मजूर गावातील शाळेमध्ये नोंदणी करण्यासाठी जमा झाले होते. मात्र, तेथे कसलीही नोंदणी सुरू नव्हती. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सौम्य लाठीचार्ज करत पांगविले.
सोशल डिस्टंसिगचा फज्जा
अफवा पसरल्यामुळे हजारो नागरिक शाळेबाहेर एकत्र जमले होते. यावेळी सोशल डिस्टंसिगचे कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत. गुरुग्राम औद्यागिक परिसर असल्याने तेथे परराज्यातील अनेक कामगार राहतात. त्यामुळे शेजारी गावांमधील स्थलांतरीत मजूरही नोंदणीच्या आशेने आले होते. त्यामुळे सगळा गोंधळ उडाला होता. कंपन्या बंद असल्यामुळे सर्वांना घरी जाण्याची घाई झाली आहे.
जमाव काही काळ अनियंत्रित झाला होती. नागरिक जमा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत नागरिकांना पांगविले.