लखनऊ - अयोध्या भूमी विवादावर सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ शनिवारी निर्णय देणार आहे. या पीठासमोर अयोध्या प्रकरणाची 40 दिवस सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी हिंदू आणि मुस्लिम पक्षांची बाजू पूर्णपणे ऐकून घेतली. १६ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणाचा निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला.
(1) सरन्यायाधीश रंजन गोगोई - गोगोई यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 ला झाला. ते भारतातील महत्त्वाचे कायदेतज्ज्ञ आहेत. रंजन गोगोई यांनी 3 ऑक्टोबर 2018 पासून भारताच्या 46 व्या आणि सध्याच्या सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या पदाचा कार्यकाळ 17 नोव्हेंबर 2019 ला संपत आहे.
भारताचे सरन्यायाधीश बनणारे ते ईशान्य भारतातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीशांचे पीठ आज (९ नोव्हेंबर) सर्वांत जास्त काळ प्रलंबित राहिलेल्या अयोध्या वादग्रस्त भूमी प्रकरणावर निकाल देणार आहेत.
(2) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे - बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 ला झाला. न्यायमूर्ती बोबडे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. ते दिल्ली विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरचे कुलपती म्हणूनही कार्यरत आहेत. न्यायमूर्ती बोबडे 23 एप्रिल 2021 ला सेवानिवृत्त होत आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात आठ वर्षे सेवा बजावल्यानंतर आता ते सरन्यायाधीश गोगोई यांच्या सेवानिवृत्तीनंतर भारताचे सरन्यायाधीश म्हणून 18 नोव्हेंबर 2019 पासून पदभार स्वीकारतील. ते 18 नोव्हेंबर 2019 ला शपथ घेतील.
(3) न्यायमूर्ती अशोक भूषण - अशोक भूषण यांचा जन्म 5 जुलै 1956 मध्ये झाला. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत. ते केरळच्या उच्च न्यायालयाचे 31वे मुख्य न्यायाधीश होते.
(4) न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड - चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 मध्ये झाला. ते सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि बॉम्बे उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. त्यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड भारतातील सर्वांत जास्त काळापर्यंत सरन्यायाधीश राहिलेले न्यायमूर्ती होते. ते 22 फेब्रुवारी 1978 पासून ११ जुलै १९८५ पर्यंत सरन्यायाधीशपदी होते. ते भारताचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांची आई प्रभा या शास्त्रीय संगीतकार होत्या.
(5) न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर - यांचा जन्म 5 जानेवारी 1958 ला बेलुदाईजवळ मुदबिद्री येथे झाला. न्यायमूर्ती नजीर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयात अब्दुल नजीर हे बहु-विश्वास पीठामधील एकमेव मुस्लीम न्यायाधीश होते, ज्यांनी 2017 मध्ये वादग्रस्त तिहेरी तलाक प्रकरणी सुनावणी घेतली. दरम्यान, न्यायमूर्ती नजीर आणि आणखी एका न्यायाधीशांनी तिहेरी तलाक (तालाक-ए-बिद्दत) या प्रथेची वैधता कायम ठेवावी, असा निकाल दिला होती. यासाठी त्यांनी 'ही प्रथा मुस्लीम शरिया कायद्यानुसार मान्य असलेली प्रथा आहे,' या तथ्याचा आधार घेतला होता. मात्र, ही प्रथा अयोग्य असल्याचा निकाल या पीठाने 3 विरुद्ध 2 बहुमताने दिला. तसेच, मुस्लीम समुदायात विवाह आणि तलाक नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने सहा महिन्यात नवा कायदा आणावा, असे निर्देशही दिले.