भुवनेश्वर : कोरोनावरील भारतीय लस 'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे. ओडिशामधील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आयएमएस) आणि एसयूएम रुग्णालयात ही चाचणी पार पडणार आहे. यासोबतच, आयसीएमआरने या टप्प्यातील चाचण्यांसाठी देशभरातील २१ वैद्यकीय संस्थांची निवड केली आहे.
भारत बायोटेक आणि आयसीएमआर संयुक्तपणे कोव्हॅक्सिनची निर्मिती करत आहेत. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे अहवाल आणि अॅनिमल चॅलेंज स्टडीचा अहवाल 'सीडीएससीओ'कडे सादर करण्यात आल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. ओडिशामध्ये या लसीची मानवी चाचणी घेणाऱ्या पथकाचे प्रमुख डॉ. ई. वेंकट राव यांनी याबाबत माहिती दिली.
तिसऱ्या टप्प्यामध्ये काही हजार लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये पूर्वीच्या टप्प्यांप्रमाणेच अर्ध्या स्वयंसेवकांना प्लासेबो आणि अर्ध्यांना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात येणार आहे. या टप्प्यातील चाचणीसाठी सामान्यांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही निवड करण्यात येणार आहे, असे राव यांनी सांगितले.
या चाचण्यांसाठी स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात स्वतःहून पुढे येत आहेत. www.ptctu.soa.ac या वेबसाईटवर स्वयंसेवक आपले नाव नोंदवू शकता, असे राव यांनी सांगितले. तसेच देशभरातून तिसऱ्या टप्प्यासाठी २८,५०० लोक सहभागी होतील अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा : देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ दिवा लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन