पणजी - दोनापावल येथील समुद्र किनाऱ्यानजीक खडकावरील अडकलेले नाफ्ता भरलेले जहाज हलविण्यासाठी आजही प्रशासनाकडून काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या बोटी 10 दिवसांपासून किनाऱ्यावर असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
पाकिस्तानहून नाफ्ता घेऊन आलेले हे जहाज अपघातात सापडून त्याचे इंजिन जळाले आहे. त्यामध्ये 2 हजार 600 मेट्रिक टन नाफ्ता हा ज्वालाग्राही पदार्थ आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर हटविण्याची मागणी विरोधपक्ष, बिगरसरकारी संस्था आणि आता दोनापावल येथील ग्रामस्थ करत आहेत. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत परिस्थितीवर लक्ष ठेवून संबंधितांशी चर्चा करत आहेत.
हेही वाचा - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एकाचा मृत्यू, १५ जखमी
रविवारी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, सदर जहाजावरील नाफ्ता दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यात येईल. त्यासाठी मुंबईहून खास हायड्रोलिक पंप आणण्यात आला आहे. जर हवामानाने साथ दिली तर सोमवारी सकाळी ही कार्यवाही सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप कोणत्याही कार्यवाहीला सुरुवात झाली नाही.
हेही वाचा - पहिल्याच दिवशी भाजप खासदाराने मोडला दिल्लीतील सम-विषम नियम
हे जहाज अडकल्यामुळे मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून मच्छीमार बोटी किनाऱ्यावरच उभ्या आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.