पणजी - गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने आयोजित केलेल्या ' द स्पिरीट ऑफ गोवा २०१९' महोत्सवाला शुक्रवारी थाटात सुरुवात झाली. गोव्यात काजू उत्पादनावर आधारित उद्योग आणि सेवा यांचे प्रदर्शन आणि विक्री तसेच पर्यटनाला चालना देणासाठी ह्या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन गोव्याच्या पर्यटन खात्याचे सचिव जे. अशोक कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यटन खात्याचे संचालक संजीव गडकर, व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई उपस्थित होते.
रविवार दि २८ पर्यंत चालणाऱ्या महोत्सवात नारळ आणि काजू यावर आधारित उत्पादने, हस्त कलेच्या वस्तू, विविध पेये आणि पारंपरिक उत्पादने यांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. तसेच काही उत्पादनांचे प्रात्यक्षिक सादर केले जातात. सोबतीला गोव्यातील पारंपरिक नृत्य आणि गाणी सादर करण्यात येतात. तसेच काजू आधारित उत्पादन कसे घ्यावे तसेच विविध अन्न पदार्थ कसे बनवावेत याविषयी मार्गदर्शनही केले जात आहे. त्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.
यावेळी बोलताना अशोक कुमार म्हणाले, गोव्यातील पारंपरिक उत्पादनांचे प्रदर्शन करत पर्यटन वाढीला चालना देणे हा सरकारचा हेतू आहे. याचे नियोजन खात्याकडून वर्षभरापासून केले जाते. गोव्यातील उत्पादने आणि उद्योजक यांना आंतरराष्ट्रीय बाजरपेठे उपलब्ध करून देण्यासाठी यामाध्यमातून प्रयत्न केले जात असतात.