पणजी - गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ढासळली असल्याने भाजपसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता काँग्रेसनेही हालचाली करायला सुरुवात केली आहे. शनिवारी काँग्रेसने राज्यपालांना पत्र लिहून गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेस आमदार दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा गोव्यात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने साडेपाच वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे.
शनिवारीपासून गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने आपल्या विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलावली आहे. तर सरकारमधील घटक पक्ष गोवा फॉरवर्ड, मगो आणि अपक्ष आमदार यांनीही भाजप नेत्यांची भेट घेतली आहे.
गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस कवळेकर यांनी शनिवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन राज्यात सरकारस्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने ते सरकार चालवू शकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी सरकार बरखास्त न करता आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, असे या पत्रात म्हणण्यात आले आहे.
तर माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत आज भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत, अशी चर्चा सुरू आहे. याविषयी सकाळी एका वाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते कवळेकर म्हणाले होत की, कामत यांचा दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता. याची त्यांनी पक्षालाही कल्पना दिलेली आहे. तर प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी याची आपल्याला कल्पना नाही, असे सांगितले आहे. दरम्यान, कामत यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २००७ ते १२ या काळात ते गोव्याचे मुख्यमंत्री होते.
काँग्रेसने केलेल्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर भाजप सावध झाला आहे. भाजपकडून सरकार वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून भाजप आमदरांच्या बैठकी घेत आहे. भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरू आहे. राज्यातील आमदारांशी चर्चा करून केंद्रीय नेतृत्व नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेईल. नवा मुख्यमंत्री विद्यमान आमदारांमधूनच निवडला जाईल. याबद्दलच्या सर्वच गोष्टी लवकरच स्पष्ट होतील, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.