जयपूर- जागतिक महामारी घोषित करण्यात आलेला कोरोना विषाणूचे संक्रमण जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. जयपूर मधील रामगंजमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी, परिचारिका कोरोनाशी लढत आहेत. मात्र, रामंगजमध्ये काम करणाऱ्या परिचारिका अनिता कुमारी यांना त्यांच्या घरी जाण्यापासून रोखण्याचे प्रकार घडत आहेत. प्रशासन आणि पोलिसांची अनिता कुमारी यांना मदत मिळालेली नाही.
अनीता कुमारी गेल्या तीन वर्षांपासून ब्रह्मपुरी रोड येथील कृष्णानगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांची नेमणूक रामगंजमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्याने करण्यात आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या घराजवळचे लोक त्यांना त्रास देत आहेत.
रुग्णालयातून घरी परतल्यानंतर अनिता कुमारी यांचा घरी जाण्याचा रस्ता बॅरिकेटस लावून बंद केला जातो. अनीता कुमारी ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत तेथील घरमालक देखील त्यांच्यावर घर सोडण्यासाठी दबाव आणत आहे. अनीता कुमारी यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली पण त्यांना त्रास देणाऱ्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही.
अनीता कुमारी यांचे पती दिल्ली येथील निजामुद्दीन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. अनीता कुमारी कोरोनाच्या लढाईत कार्यरत आहेत तरिही समाजाने त्यांना दिलेली वागणूक योग्य नाही, असे दिसून येते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याची कार्यवाही झालेली दिसत नाही.