नवी दिल्ली - वरिष्ठ पत्रकार व रिपब्लिक हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामीवर बुधवारी रात्री झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर झालेला हल्ल्याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत. या हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे, असे एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने म्हटले आहे.
पत्रकाराविरूद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार पसरवणे आणि द्वेषपूर्ण भाषण करणे हे द्वेषयुक्त कृत्य आहे. कोणतीही भीती न बाळगता विचार व्यक्त करण्याची किंवा तथ्यांविषयी बोलण्याचे स्वातंत्र्य हे पत्रकारितेचे सर्वात मूलभूत तत्त्व आहे. हल्लेखोरांविरोधात कारवाई करावी, अशा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
22 एप्रिलच्या पहाटे अर्णब गोस्वामी पत्नीसह वाहनातून घराकडे जात होते. या दरम्यान दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या दोघांनी त्यांच्या वाहनावर शाई फेकली. तसेच चारचाकीची काच फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहे.