श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याची माहिती मिळत असल्याचे आज(शुक्रवार) लष्कराने म्हटले आहे. मात्र, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचा विश्वास लष्कराकडून देण्यात आला आहे. जानेवारीपासून लष्कराने काश्मीर खोऱ्यात सव्वाशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यासाठी अनेक ऑपरेशन राबविण्यात आले असून त्यात लष्कराला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.
9 राष्ट्रीय रायफल्सचे विभागीय कमांडर ब्रिगेडीयर व्ही. एस ठाकूर म्हणाले की, महामार्ग क्रमांक 44 वर कुठेतरी दहशतवादी यात्रेकरुंवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. यात्रेकरूंना लक्ष्य करण्याचा जोरदार प्रयत्न दहशतवाद्यांकडून होणार आहे. मात्र, लष्कर हल्ला रोखण्यास सज्ज आहे.
कुलगाम जिल्ह्यात चकमकीत जे तीन दहशतवादी ठार झाले. त्यांच्यात वालीद नावाचा एकजण पाकिस्तानचा नागरिक आहे. 21 ऑगस्टला सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या आधी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे. शांततेत यात्रा पार पाडण्याचा लष्कराचा संदेश स्पष्ट आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय ही यात्रा होईल, असे ठाकूर म्हणाले.