नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातलेले आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा कहर कमी होत नसताना आता दहशतवादी संघटनाही या विषाणूचा वापर वर्चस्व आणखी मजबूत करण्यासाठी करत आहेत, असा खुलासा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना इंटरपोलने मंगळवारी केला.
इंटरपोलने यासंबंधी एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात जागतिक दहशतवादावर कोविड-19 या विषाणूचा किती परिणाम झाला या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने 5 धोक्यांशी संबंधित घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये कोविड-19 चा प्रकोप यांच्याशी संबंधित वैद्यकीय प्रगति, जागतिक व राष्ट्रीय प्रतिक्रिया, सामाजिक वातावरण, सुरक्षा तंत्रांशी संबंधित लवचिकता, दहशतवाद्यांची रणनिती व क्षमता यासह अराजकीय घटक (नॉन स्टेट अॅक्टर्स) यांचा समावेश आहे. नॉन स्टेट अॅक्टर्स म्हणजे अशा संघटना ज्या कोणत्याही राजकीय संघटनेशी किंवा एखाद्या विशेष राष्ट्राशी संलग्न नसतात. मात्र, तरीही यांचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबींसंबंधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर बऱ्यापैकी प्रभाव असण्याची शक्यता असते.
इंटरपोलने म्हटले, की काही भागांमध्ये कोविडचा धोका कमी होत आहे तर काही ठिकाणी कोविडचा धोका वाढत आहे. दहशतवाद्यांचे नेटवर्क, हिंसक अतिरेकी गट, संभाव्य धोकादायक अराजकीय घटकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांवर नजर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीस इंटरपोलने 194 सदस्य देशांच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना दक्षतेचा इशारा दिला होता. इंटरपोलनेया एजन्सींना संघटित गुन्हेगारी नेटवर्क शारीरिक व ऑनलाइन या दोन्ही माध्यमातून कोविड-19 व्हॅक्सिनला लक्ष्य करू शकतात, असेही म्हटले आहे. इंटरपोलने जारी केलेल्या नोटीसमध्ये ऑरेंज नोटीससह कोविड-19 आणि फ्लूचे बनावट प्रकार, त्यांची चोरी आणि अवैध जाहिरातीच्या संबंधात संभाव्य गुन्हेगारी कारवायांचा हवाला देण्यात आला आहे.
इंटरपोलने म्हटले आहे, की काही दहशतवादी गट आणि अन्य अराजकीय घटक कोरोनाचा उपयोग त्यांची शक्ती आणि प्रभाव अधिकाधिक बळकट करण्यासाठी करत आहेत. अहवालात म्हटले आहे, की विशेषत: स्थानिक लोकांसाठी किंवा बाह्य आर्थिक स्त्रोतांचा विस्तार करण्यासाठी, अशी पाऊले उचलण्यात येत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थावर कोरोनाचा कशा रितीने परिणाम झाला आहे यासह दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या निधीवरपण अप्रत्यक्षरित्या याचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. इंटरपोलचे सरचिटणीस जर्गन स्टॉक यांनी यासंबंधी इशारा दिला आहे, की गुन्हेगारांप्रमाणेच दहशतवादीही कोविड-19 च्या परिस्थितीत नफा कमवण्यासाठी, जास्तीत जास्त पैसे कमावून आपला पाया आणखीन भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
स्टॉक म्हणाले, की कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यासाठी आमचा दहशतवादी मूल्यांकन अहवाल हा एक महत्त्वाचे साधन सिद्ध होऊ शकते. हा अहवाल अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत जारी करण्यात आलेला आहे.
अहवालात संभाव्य धोक्यांना दूर करण्यासाठी जागतिक कायदा अंमलबजावणी करणाऱ्या समुदायांसाठी शिफारसींची व पूर्व इशारा देण्यात आल्याचे संकेत आहेत. दिल्लीतील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले, की ते अहवालाचे निरीक्षण करत आहेत व दहशतवाद्यांच्या प्रत्येक गतिविधींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.