नवी दिल्ली - सध्या देशभरात मॉब लिंचिंगमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. यातच तेलगंणा राज्यातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी 'जोपर्यंत गोहत्या बंदी विधेयेक मंजूर होत नाही, तोपर्यंत अशा हत्या होतच राहतील', असे वादग्रस्त विधान केले आहे. मध्यप्रदेशमधील नलखेडा गावामध्ये देवीच्या दर्शनावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
'जोपर्यंत गोहत्या बंदी विधेयक मंजूर होत नाही. तोपर्यंत मॉब लिंचिंगच्या घटना घडणार आणि खाटकाच्या हत्या देखील होणार. काही समाज आम्ही पाच आणि आमचे पन्नास ही योजना घेऊन पुढे जात आहे. पंतप्रधान मोदी लोकसंख्येवर नियत्रंण आण्यासाठी कायदा करत आहेत. त्याचे मी समर्थन करतो, असे ते म्हणाले.
कर्नाटकसारखे सत्तांत्तर मध्यप्रदेशमध्ये देखील होईल. काँग्रेसमधील मोठे नेते आणि आमदार भाजपमध्ये येतील आणि मध्यप्रदेशमध्ये भाजप सत्तेत येईल, असेही ते म्हणाले.
मॉब लिंचिंग एक मोठ्या आजाराप्रमाणे देशात पसरत आहे. मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटना थांबायला हव्यात यासाठी ४५ पेक्षा जास्त सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.