हैदराबाद - आपल्या जावयाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये आपल्या मुलीने एका ख्रिश्चन तरुणाशी विवाह केल्यामुळे, त्या तरुणाचा खून केल्याचा आरोप या व्यक्तीवर होता. मारुती राव (वय - ५३) असे या व्यक्तीचे नाव आहे.
प्राथमिक तपासणीनंतर मारुती यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. राव यांनी शनिवारी रात्री एका लॉजमध्ये रूम बुक केली. रविवारी सकाळी त्यांचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून त्यांच्या रुममध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांना राव यांचा मृतदेह खाटेवर पडलेला आढळला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आत्महत्या करण्यापूर्वी मागितली बायको-मुलीची माफी..
पोलिसांना राव यांच्या खोलीमध्ये एक चिट्ठी सापडली. राव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ही चिट्ठी लिहिली होती. यामध्ये आपण केलेल्या कृत्यासाठी त्यांनी आपली बायको आणि मुलीची माफी मागितली असल्याची माहीती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मुलगी गर्भवती असताना केला होता जावयाचा खून..
सप्टेंबर २०१८ मध्ये कुमार या दलित तरुणाचा खून केल्याप्रकरणी राव यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. २३ वर्षांच्या कुमारने राव यांच्या मुलीशी विवाह केला होता. कुमार दलित ख्रिश्चन असल्यामुळे राव यांचा या विवाहाला विरोध होता. नालगोंडा जिल्ह्यातील मिऱ्यालगुडा शहरात कुमार आणि राव यांची मुलगी रूग्णालयातून बाहेर पडत असताना, कुमारवर एका व्यक्तीने कोयत्याने वार करत त्याचा खून केला होता. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडिओने देशभरात खळबळ माजली होती.
या घटनेनंतर, आपल्या वडिलांनी आणि काकांनी मिळून कुमारच्या खुनासाठी एक कोटींची सुपारी दिल्याचा आरोप त्यांच्या मुलीने केला होता. यासंबंधी पोलीस तपासात हे समोर आले होते, की राव यांनी खुनासाठी एका व्यक्तीला १५ लाख रुपये अॅडव्हान्स दिला होता.
हेही वाचा : राजस्थान : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात ठार, ३२ जखमी..