हैदराबाद - तेलंगणा काँग्रेस निष्ठावंत मंचाच्या काही नेत्यांनी मंगळवारी अंतरिम काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले. पक्षाचे नेतृत्व राहुल गांधींकडे सोपवण्यासाठी काँग्रेसचे सत्र लवकरात लवकर बोलवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पत्राव्दारे केली.
पक्षाचे पुनरुज्जीवन आणि मजबुतीकरण केवळ राहुल गांधींच्या नेतृत्वात शक्य असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे, असे या पत्रात म्हटले आहे. या नकारात्मक परिस्थितीत देशाला वाचवण्यासाठी लोकांना काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत, असेही पत्रात नमूद केल्याचे तेलंगणाचे ज्येष्ठ काँग्रेस नेते मर्री शशिधर रेड्डी यांनी सांगितले.
हेही वाचा - Delhi Violence : सोनिया, राहुल यांनी केलं शांततेचं आवाहन
काँग्रेस सत्तेत असताना देशात विकास झाला. शिवाय विरोधी पक्ष म्हणून देखील पक्षाने उल्लेखनीय काम केले आहे. हे सर्व गांधी परिवारातील सदस्याच्या नेतृत्वातच झाले, असेही ते म्हणाले. दरम्यान, शशी थरुर आणि संदीप दिक्षित यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी पक्षातील उच्च पदांसाठी फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे.