रांची - बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगत आहेत. त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे ते रांचीच्या रिम्स रुग्णालयात भर्ती आहेत. शनिवारी त्यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव त्यांना भेटायला गेले असता पोलिसांनी त्यांना रुग्णालयाच्या बाहेरच अडवून धरले. तर, लालूंना भेटण्यास त्यांना मज्जाव घालण्यात आला.
लोकसभा निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला ४ दिवस शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तेजस्वी यादव यांची झारखंडच्या पलामू येथे सभा होती. ती आटोपल्यानंतर ते लगेच रांची येथे लालूंना भेटण्यासाठी दाखल झाले. मात्र, उशिर झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना लालूंना भेटू दिले नाही. आपल्याजवळ भेटण्याची परवानगी असतानाही सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस आपल्याला अडवत आहेत, असा आरोप तेजस्वी यांनी लावला आहे.
तेजस्वी यादव यांनी लालूंना भेटण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. त्यासाठी त्यांनी तेथूनच तुरुंग अधीक्षकाला फोन लावला. मात्र, अधीक्षकांनी शेवटपर्यंत तो उचललाल नाही. हे सर्व सरकारच्या सांगण्यावरुन केले जात आहे, असे तेजस्वी यांचे म्हणणे आहे. तेजस्वी यादव रविवारी पुन्हा लालू प्रसाद यादवांची भेट घेणार आहेत.
लोकसभा निवडणूकांच्या रणनीतीसंदर्भात बोलण्यासाठी तेजस्वी लालू प्रसाद यादव यांना भेटण्यासाठी आले होते, असे म्हटले जात आहे. लालू प्रसाद यादव रुग्णालयातच बसून बिहारचे राजकारण चालवत आहेत, अशीही चर्चा आहे. सीबीआयचे डायरेक्टर एका क्षणात बदलू शकतात तर हे केवळ एक पोलीस अधिकारी आहेत. ते सर्व आपल्या 'आका'च्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असा आरोपही तेजस्वी यांचा आहे.
तेजस्वी यादव झारखंडच्या पलामू येथे घूरन राम या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांची मोठी जनसभा तेथे होती. मात्र, काही कारणास्तव त्यांना सभेमध्ये उशीर झाला. त्यामुळे ते रुग्णालयात उशीरा पोहोचले. तेजस्वी यादव यांच्याजवळ परवानगी असली तरी ते ठरावीक वेळेच्या नंतर आले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.