जमुई - बिहारमध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. जेडीयू, भाजपा आणि लोक जनशक्ती पार्टी यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी चिराग पासवान यांच्यासाठी आशेचा किरण ठरणार वक्तव्य केले आहे. जमुई येथे निवडणूक दौऱ्यादरम्यान ईटीव्ही भारतने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गरज पडल्यास ते निवडणुकीनंतर चिराग पासवान यांना सोबत घेतील, असे संकेत दिले.
जमुई येथील प्रचार सभेला संबोधित केल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, यावेळी बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. वेळ येताच ते चिराग पासवान यांच्यासमवेत बिहारमध्ये सरकार स्थापन करू शकतात. तसेच जमुई जिल्ह्यातील झाझा, जमुई, सिकंदरा आणि चकाई विधानसभांमध्ये आपले उमेदवार नक्की विजयी होतील, असा विश्वास देखील तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात असलेले तेजस्वी यादव यांनी रविवारी जमुई जिल्ह्यातील श्री कृष्णसिंग स्टेडियम मैदानात सभा घेतली. जिथे त्यांनी आपल्या चार मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
जमुई जिल्ह्यात 28 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. आरजेडीचे उमेदवार सतत निवडणूक प्रचार करत आहेत. त्याचबरोबर, भाजपाच्या तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवणारे श्रेयसी सिंग देखील संपूर्ण जोमाने प्रचारात सक्रिय आहेत.