मंडी (हिमाचल प्रदेश) - घराच्या चार भिंती ओलांडून महिलांनी आज आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जमीनीपासून तर आकाशापर्यंत आज महिलांनी मजल गाठली आहे. मदर तेरेसा, सावित्रीबाई फुलेपासून कल्पना चावलापर्यंत अनेक महिलांनी आपल्या जोरावर स्वत:ला सिद्ध केले आहे. अशाच एका नारीशक्तीबाबत आज आपण बोलणार आहोत.
हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील तवारकू देवी या येथील स्थानिक महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. एमए पदवीधर असलेल्या तवारकू यांनी घरातील टाकाऊ वस्तू आणि पाईन वृक्षाच्या पानांपासून नवनवीन साहित्य तयार करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याला प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांच्या घरची आर्थित परिस्थीतीही सुधारू लागली. यानंतर, एक-एक करत महिला त्यांच्याशी जुळत गेल्या आणि त्यांनी एक गट स्थापन केला. या गटाच्या माध्यमातून आज कित्येक महिलांना रोजगार प्राप्त होत आहे.
तवारकू देवी या एमए पदवीधर आहेत. त्या कुठल्याही कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करू शकल्या असत्या. मात्र, त्यांनी स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारला. २०११ मध्ये काही महिलांच्या सोबतीनं या उपक्रमाची सुरुवात केली होती. आज त्याचे रुपांतर एका टीममध्ये झाले असून अनेक महिला टाकाऊ वस्तूंपासून नवनवीन उत्पादनं तयार करून बाजारात विक्री करतात. यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळते. त्यांच्या या कार्यावर बीबीसी लंडनने एक डॉक्युमेंट्री तयार केली होती. ज्यामुळे या महिलांना दिल्लीत पुरस्कारही मिळाला. अनेक नेते अभिनेत्यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा केली, हे विशेष.
आज तवारकू देवी आणि त्यांच्याशी संबंधित महिला त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वप्नालाही बळकटी देत आहेत. घरातल्या चार भिंतीत राहणाऱ्या महिलेनं ठरवलं तर ती आकाशापर्यंत उंच झेप घेऊ शकते हेच तवारकू देवी आणि त्यांच्यासारख्या इतर कर्तृत्ववान महिलांच्या कार्यातून स्पष्ट होते.