मदुराई - तामिळनाडूतील मदुराई येथे एका 19 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. दुर्गा असे मुलीचे नाव असून राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या भितीने तिने आत्महत्या केली आहे. तिची सुसाईड नोट पोलिसांना आढळली असून आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
कुटुंबाला माझ्याकडून बर्याच अपेक्षा आहेत. जर मला योग्य महाविद्यालयात जागा मिळाली नाही तर कुटुंबाची मेहनत व्यर्थ जाईल. मला माफ करा, असे तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. दुर्गाचे वडील मुरुगा सुंदरम राज्य पोलीस दलामध्ये उपनिरीक्षक आहेत. दरम्यान, याप्रकरणी मदुराई पोलीस तपास करत आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यांमध्ये कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, नीटच्या परीक्षा 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. देशभरातून नीटसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध राज्यांमधून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने संबधित याचिका फेटळल्या होत्या. कोरोनाची स्थिती पुढील वर्षीही राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान न होता, शिक्षण सुरू राहणं आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले होते.पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांनी ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती.