चेन्नई - तामिळनाडूतील तुतीकोरीनमधील पिता पुत्राच्या कोठडीतील छळाचे प्रकरण राज्य सरकारने सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणानंतर राज्यभरात पोलिसांच्या अमानुष छळाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. हे प्रकरणी सीबीआयकडे देण्यात येईल असे, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज(रविवारी) स्पष्ट केले.
मद्रास उच्च न्यायालयाला राज्य सरकारचा निर्णय कळविण्यात आला आहे. केंद्रीय संस्थेकडे तपास हस्तांतरीत करण्याचा निर्णयावर न्यायालयाची परवानगी घेण्यात येईल. त्यानंतर तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पत्रकारांना सांगितले.
उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाकडून हे प्रकरण सीबीआयकडे पाठविण्यासाठी आम्ही परवानगी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कोठडीतील मृत्यूप्रकरणी न्यायालयात 30 जून रोजी सुनावणी होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काय आहे प्रकरण?
तुतीकोरीनमधील संथलकुलम येथे जयराज आणि त्यांचा मुलगा फिनिक्सने मोबाईलचे दुकान उघडल्याने पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणा दोघांना 23 जूनला ताब्यात घेतले होते. या पिता पुत्राला नंतर पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र, उपचार चालू असताना दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांचा कोठडीत छळ केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि कुटुंबियांनी केला आहे.
याप्रकरणी राज्यातील वातावरण पेटले असून पोलीसांच्या छळाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. यासंबधी दोन पोलीस उपनिरिक्षकासह चौघांना निलंबितही करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे.