चेन्नई : पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत एका पिता-पुत्रांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, तामिळनाडूमध्ये आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. तुटीकोरीन परिसरातील एका २५ वर्षीय रिक्षाचालकाचाही पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे. एन. कुमारसेन असे नाव असलेल्या या रिक्षाचालकाच्या वडिलांनी सब इन्सपेक्टर चंद्रशेखर, आणि पोलीस अधीक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमारसेन याला आठ जूनला तेनकासी पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यात आले होते. जमीनीसंबंधी एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्याला बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी सब इन्सपेक्टर चंद्रशेखर यांनी कुमारसेन याला थप्पड मारली होती, आणि पुन्हा दोन दिवसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
दोन दिवसांनंतर पुन्हा कुमारसेन पोलीस ठाण्यावर गेला. तेव्हा चौकशीदरम्यान पोलीसांनी त्याला बेदम मारहाण केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी केलेल्या मारहाणीत त्याच्या खालच्या ओटीपोटीला गंभीर इजा झाली होती. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांनाही मारहाण करू, अशी धमकी पोलिसांनी त्याला दिली होती.
त्यानंतर १२ जूनला त्याला तिरुनेलवेली वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुमारसेन याने डॉक्टरांना सगळी माहिती सांगितली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या यकृत आणि मूत्रपिंडालादेखील गंभीर इजा झाली होती. २७ जूनला अखेर कुमार याची मृत्यूशी झुंज संपली.
अगोदरच तामिळनाडूमधील जयराज आणि फेनिक्स या बापलेकांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकारही मोठ्या प्रमाणात या घटनेचा निषेध करताना दिसून येत आहेत. समाजमाध्यमांमध्येही या दोघांना न्याय मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. तसेच या दोघांच्या मृत्यूची तुलना अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईड याच्या मृत्यूशी करण्यात येत आहे. त्यातच आता तुटीकोरीनमधील ही घटना समोर आली आहे.
हेही वाचा : देशविरोधी पत्रकारितेवरून प्रसारभारतीची पीटीआयला ताकीद; काँग्रेसकडून पाठराखण