चेन्नई : तामिळनाडूच्या धर्मपुरीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सालेम-बंगळुरू महामार्गावर झालेल्या या अपघातात तब्बल १५ वाहनांनी एकमेकांना धडक दिली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
असा झाला अपघात..
सालेमला जात असणारी एका भरधाव मिनी लॉरीवरील चालकाचा ताबा सुटल्याने, ही लॉरी उलटली. महामार्गाच्या मधोमध ही लॉरी उलटल्यामुळे मागून वेगात येत असणारी सुमारे १४ वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने धर्मपुरीच्या सरकारी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
क्रेनच्या सहाय्याने मोकळा केला रस्ता..
या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर कित्येक तास रस्ता ब्लॉक झाला होता. अखेर रस्त्यातील वाहने बाजूला करण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. त्यानंतर रस्त्यवरील वाहतूक सुरळीत झाली.
अपघातात मृत झालेल्यांची ओळख अद्याप पटली नसून, मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच, हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : राजस्थानमध्ये भीषण अपघात: ट्रेलरने कारला दिली धडक, 8 जण ठार