पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची धामधुम संपली असून आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्यास गेले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने महत्त्वाची खाती आणि विभाग भाजपा मागण्याची शक्यता आहे.
एनडीएतील भाजपाला ७४ तर जनता दल युनायटेड पक्षाला ४३ जागा मिळाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच करण्यात येईल असे भाजपाने आधीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री पद जेडीयूकडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, महत्त्वाच्या खात्यांवर भाजपाचा डोळा असून त्यासाठी तडजोड करण्यास भाजपा तयार नसल्याचेही समोर येत आहे. कारण, बिहारमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून जेडीयूचा जनाधार कमी झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. माजी उप मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी शुक्रावारी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. आज ते माघारी राज्यात आले आहेत.
रविवारी एनडीएची बैठक
सत्ता स्थापनेसंदर्भात रविवारी एनडीएची बैठक होणार आहे. यामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी कामेश्वर चौपाल यांचे नाव समोर येत आहे. सुशील कुमार यांच्या दिल्ली भेटीला विविध अंगाने पाहण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा? कोणती खाती भाजपाकडे असावी, यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
नव्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता
बिहारमधील वरिष्ठ नेतृत्त्वाने यावेळी बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेक नव्या नेत्यांना सरकारात संधी मिळण्याची शक्यता आहे. रविवारी एनडीएची बैठक होत आहे. याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल आमदारांशी चर्चा करणार आहेत. बैठकीनंतर भाजपाची रणनीती समोर येणार आहे.