पटना - अभिनेता सुशात सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहारवरून मुंबईत आलेले चार अधिकाऱ्यांचे पथक आज (गुरुवार) पटनाला माघारी गेले आहे. तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या या पोलीस पथकाला मुंंबई महानगर पालिकाने क्वारंटाइन करून ठेवले होते. त्यावरून बिहार आणि मुंबई पोलिसांत चांगलीच जुंपली आहे. मुंबई पोलिसांच्या या वागणूकी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे बिहार पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे.
बिहार पोलिसांचे पथक आता पटना वरिष्ठ पोलीस अधिक्षक उपेंद्र शर्मा यांना आपला तपास अहवाल सादर करणार आहे. आज (गुरुवार) दुपारी पोलिसांचे पथक पटना विमानतळावर माघारी पोहोचले. तपास पथकाने माध्यमांशी जास्त चर्चा केली नाही. कठीण परिस्थितीतही या खटल्या संबंधी पुरावे मिळवल्याचे फक्त त्यांनी सांगितले.
सुशांतसिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी 25 जुलैला पटना शहरातील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. याच्या तपासासाठी 27 जुलैला बिहार पोलिसांचे पथक मुंबईला आले होते. पटना पोलीस अधिकारी विनय तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मुंबईत आले होते. मात्र, त्यांना महानगर पालिका प्रशासनाने क्वारंटाईन केले होते.