नवी दिल्ली - ट्विटरवर दोन दिवस काँग्रेसचे युवा आणि ज्येष्ठ नेते यांच्यात खडाजंगी झाल्यानंतर पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोशल मीडियावर न राहता अंतर्गत बैठकीत अशा विषयांवर चर्चा करण्याचे स्पष्ट बजावले.
‘सोशल मीडियावर ट्विटर-ट्विटर खेळणारे आणि त्यांची मते सार्वजनिक करणार्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, सोनियाजी आणि राहुलजी यांच्या नेतृत्वात तुम्ही पक्षाच्या व्यासपीठावर जे काही इच्छिता, ते बोलू शकता. कारण, आमच्याकडे अंतर्गत लोकशाही आहे. आम्ही लोकांना सेवानिवृत्तीसाठी भाग पाडत नाही,’ असे सुरजेवाला रविवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.
काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध भडकले. राजीव सातव यांनी यूपीए -२ च्या कामकाजाचा आढावा घेण्यास पक्षाला सांगितले. त्यांनी काँग्रेसची संख्या 2014 लोकसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागांवरून घसरून अवघ्या 44 वर आल्याचा मुद्दा उपस्थित केला.
‘तरुणांना मार्गदर्शन करणे, त्यांना मार्ग दाखवणे आणि त्यांना पुढे नेणे ही आता वरिष्ठ नेत्यांवर अधिकची जबाबदारी आहे. त्यांनी केवळ संघटनेतच नव्हे तर सरकारमध्येही काम केले होते,’ असे रणदीप सुरजेवाला म्हणाले. ‘भाजप-एनडीए सरकारच्या जनविरोधी धोरणांविरूद्ध संघर्ष करण्यासाठी आपल्याला एकत्र उभे राहण्याची गरज आहे,’ असे ते पुढे म्हणाले.
शनिवारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनीही या विषयावर स्पष्टीकरण दिले. ‘लोकशाही पक्ष म्हणून काँग्रेस नेहमीच त्यांच्या कामगिरी व अपयशावर चर्चेसाठी खुले असते. प्रामाणिक आत्मनिरीक्षण आणि विश्लेषण नेहमीच उपयुक्त ठरते आणि पुढे जाण्यासाठी सामर्थ्य देते,’ असे ट्वीट त्यांनी केले.