पणजी - ज्येष्ठ अनुवादक पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनानंतर त्यांच्या इच्छेनुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आले. रविवारी पणजीतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. सोमवारी सकाळी म्हापसा येथील एका शाळेच्या प्रांगणात आमोणकर यांचा पार्थिव जनतेच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
हेही वाचा - संसदेत एमआयएम खासदार ओवेसींनी फाडली नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उद्योजक श्रीनिवास धेंपो, गोवा सुरक्षा मंचचे नेते सुभाष वेलिंगकर, अरविंद भाटीकर, दिलीप भाटीकर, साहित्यिक महाबळेश्वर सैल, म्हापसाचे आमदार जोशूआ डिसोझा, आमदार एलिना सालढाणा, नगरसेवक रायन ब्रागांझा यांच्यासह अनेकांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर आमोणकर यांच्या इच्छेनुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला पार्थिव दान करण्यात आले.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी केले अमित शाहांचे कौतुक
आमोणकर यांना साहित्य अकादमीसह ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी बौद्ध धर्मियांच्या 'धम्मपद' ग्रंथाचे कोकणीत भाषांतर केले आहे. यासाठी ते पाली भाषा शिकले होते. अलिकडे त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकांचा अनुवाद करण्यास सुरुवात केली होती. नव्वदी पार केलेल्या आमोणकर यांनी यापूर्वी 4 वेळा कर्करोगाशी यशस्वी सामना केला होता. त्यांच्या या निधनामुळे गोव्याच्या साहित्य क्षेत्राचे नुकसान झाले, असे अनेकांनी श्रद्धांजली व्यक्त करताना म्हटले आहे.