गांधीनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तरीही कित्येक लोक घरातून बाहेर पडत आहेत. देशभरातील पोलीस कर्मचारी लोकांना घरातून बाहेर न पडू देण्यासाठी नाना प्रकार अवलंबवत आहेत. गुजरातच्या सूरतमधील पोलीसही लोकांना घरात राहायला सांगण्यासाठी अभिनव पद्धतीने आवाहन करत आहेत.
सूरतच्या जहांगीरपुरा भागातील पोलीस, हे लोकांना काठीच्या माध्यमातून नव्हे, तर चक्क गाण्यांच्या माध्यमातून घरात राहण्यास सांगत आहेत. हे पोलीस लोकांना लाऊडस्पीकर वरून देशभक्तीपर गीते ऐकवत आहेत. या गीतांच्या माध्यमातूनच ते लोकांना आवाहन करत आहेत, की लॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरातून बाहेर पडू नका.
पोलिसांच्या इतर पद्धतींपेक्षा, ही पद्धत लोकांना चांगलीच आवडत आहे. तसेच, या आवाहनाला लोकांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. लोकांनी पोलिसांना आपापल्या घरांमधून मोबाईलच्या फ्लॅश-लाईट्सच्या माध्यमांतून प्रतिसादही दिला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीसही आपले प्राण पणाला लावून कोरोनाविरोधात लढा देत आहेत.