नवी दिल्ली - स्वयंघोषित अद्यात्मिक गुरू आसारामला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दणका दिला आहे. गुजरातमधील सुरत लैगिंक अत्याचार प्रकरणी आसारामने जामीन मागितला होता, हा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
सुरत लैगिंक अत्याचार प्रकरणात अद्याप १० साक्षीदारांचे जबाब नोंदवणे बाकी असल्याचे गुजरात सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले. याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विचार न करता जिल्हा न्यायालयाने खटला पूर्ण करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामची शिक्षा रद्द करण्यासाठी यापूर्वी गुजरातच्या उच्च न्यायालयात २६ मार्चला याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच जामीन मिळावा म्हणूनही आसारामने जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, याचिका आणि जामीन अर्ज दोन्हीही न्यायालयाने फेटाळून लावले होते. सुरत लैगिंक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आसाराम सध्या तरुंगाची हवा खात आहे. त्याशिवाय राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात २०१३ मध्ये एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आसाराम भोगत आहे.